पावणेदोन वर्षांपूर्वी कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि गेल्या शंभर वर्षांत जो अनुभव आपल्याला घ्यावा लागेल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते, असा अभूतपूर्व लॉकडाऊन सुरू झाला.
देशभरातल्या अगदी श्रीमंतातल्या श्रीमंत कुटुंबापासून गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत फक्त आणि फक्त अन्नावर, त्यात भाजीपाला आणि दूधही समाविष्ट आहे, लागल्यास औषध पाणी यावरच खर्च होऊ लागला. मुद्दाम ठरवून सुद्धा वायफळ खर्च करता येत नव्हता.
हॉटेलिंग नाही, केस कटिंग नाही, पेपर नाही, प्रवास खर्च नाही, पेट्रोल, डिझेल नाही, इस्त्रीवाला नाही, ब्युटीपार्लर नाही, कपडे खरेदी नाही, चप्पल, बूट खरेदी नाही, स्टेशनरी नाही, लग्न कार्य, दाग-दागिने नाहीत, अन्य कुठल्याच अगदी लाजेकाजे खातर कराव्या लागणाºया शुभ किंवा अशुभ प्रसंगी खर्च करण्याची पाळी येऊच शकत नाही, आऊंटिग नाही, कोणी म्हणेल हे काही जीवनावश्यक नाही, ते पूर्वीही नव्हतेच, तरीही त्यावर गेली कैक वर्षांपासून खर्च होतोच आहे.
निम्न आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून याकामासाठी पहिल्या काही महिन्यांत खर्चच झालेला नाही. ठरवून खर्च करायचा म्हटले, तरी तशी संधीच नाही. मोबाइलचा तीन-तीन महिन्यांचा रिचार्ज भरून झालेलाच आहे. बाकीच्या देणेकºयांना सध्याच्या विचित्र परिस्थितीत लगेचच रोख पैसे द्यावे लागतील असे नाही. घरभाडे, लाईट बील, गॅस बील पूर्वीही होतेच. त्यात थोडीफार वाढ होईल.
ज्या गोष्टी जीवनावश्यक नव्हत्याच तरीही त्या सर्व गोष्टी जीवनाशी निगडित आणि जीवनशैलीचा भाग गेली काही वर्षे होऊन बसल्या आहेत.
इतर वेळी म्हणजे कोरोनाचे संकट नसताना, अदृष्य पैशांच्या राशी किरकोळ बाजारात कशा प्रकारे धुमाकूळ घालत होत्या, ते सर्वांनी गेल्या काही वर्षांपासून अनुभवले आहे. अनावश्यक खरेदीच्या थक्क करणाºया लाटांवर लाटा सर्व वस्तूंच्या किरकोळ बाजारात उसळत होत्या.
कोरोनाच्या दणक्याने देशाची आर्थिक प्रकृती साफ बिघडली. दिवसेंदिवस त्यात सुधारणा होईलही, पण ज्या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला जाईल, त्या दिवशी मध्यमवर्गीयांकडे असलेली बचत देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या चाकाला पहिला जोराचा धक्का देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वाटते. कारण वर म्हटलेल्या सर्व गोष्टी त्याला परत जशाच्या तशा हव्या आहेत, त्यासाठी तो हात आखडता ठेवून का होईना, त्याच्याकडे असलेला पैसा बाजारात आणू लागेल.
सरकारच्या विविध योजनांद्वारा गरीबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल. तो पैसासुद्धा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बाजारात येईल.
प्रगती चक्राने गती घेतली की, हरहुन्नरी, धडाडीने काम करणारे, हातात आलेल्या प्रत्येक संधीच सोन करण्याची हिंमत दाखवणारे, वैभवशाली स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जिद्द आणि उमेद असणारे व्यावसायिक, देशाच्या प्रगतीचे चाक पूर्ण ताकदीनिशी फिरवण्याचा प्रयत्न करू लागतील. त्यातून रोजगार उपलब्ध होऊ लागेल. त्याची प्रचिती बाजारात दिसू लागली आहे.
निरिक्षण इतकेच की, देशाच्या पूर्णपणे थांबलेल्या अर्थचक्राला पहिला धक्का देण्यासाठी मध्यम वर्ग उपयुक्त ठरेल, असा एक अंदाज वर्तवासा वाटतो. देशाच्या अर्थ कारणाशी निगडित, जागतिक अर्थव्यवस्था वगैरे इतर प्रवाह किंवा मुद्दे त्यानंतर.
एखादे वाहन पुढे मार्गस्थ होण्यासाठी कुठला तरी फोर्स वापरून ते जागचे प्रथम हलवावे लागते. त्यात असलेल्या अदृष्य फोर्सला एक बटण दाबून त्या फोर्सला अॅक्टिवेट करावे लागते आणि ते बटण दाबण्याचे काम करतो, त्या वाहनाचा ड्रायव्हर. गमतीचा भाग असा की, हा ड्रायव्हर नेमका मध्यमवर्गीयांतच मोडतो.
मी अर्थतज्ज्ञ नाही किंवा कुठल्याच विषयाचा तज्ज्ञ नाही, तरीही अनुभव आणि एक निरीक्षण यावरून मी काढलेला निष्कर्ष किंवा तर्क असा की, पूर्णपणे थांबलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या कामाची सुरुवात, किरकोळ विक्रेत्याच्या मार्फत मध्यमवर्गीयांकडून केली जाईल.
– मोहन गद्रे
ँ१िी‘ं‘ं@ॅें्र’.ूङ्मे\\