मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटींच्या वसुलीचा लेटरबॉम्ब टाकणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्या आरोपासंदर्भात आपल्याकडे जास्तीचे पुरावे नसल्याचे या आरोपांचा तपास करणाऱ्या आयोगाला कळवले आहे. परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे चांदिवाल आयोगाकडे ही माहिती नोंदवल्याचे एका वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे. या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात चांदिवाल आयोगाकडे यापूर्वीच्या सुनावणीतच संबंधित प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी सांगितल्याचा दावा केला होता. हे पत्र प्रकाशात आल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. याच प्रकरणी अनेक दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने सोमवारी रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केलीे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास चांदिवाल यांची नियुक्ती केली आहे. चांदिवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग चौकशीसाठी किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. यासाठी न्या. चांदिवाल आयोगाने त्यांना दोन वेळा आर्थिक दंडही सुनावला आहे. पहिल्यांदा गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना ५ हजार आणि दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याबद्दल २५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष असलेले वकील शिशीर हिरे यांनी सांगितले की, सिंग यांनी त्यांच्या आरोपांसंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे. ॲड. शिशीर हिरे हे चांदिवाल आयोगाचे वकील आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राशिवाय,त्यांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे अतिरिक्त तपशील किंवा पुरावे नसल्याचे परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कळवल्याचे शिशीर हिरे यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी परमबीर सिंग कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचे हिरे यांनी सांगितले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …