ठळक बातम्या

‘ही’ कविता अजूनही रात्र-रात्र झोपू देत नाही!

मुंबई  – वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव करणारे सामान्य लोक, अनुभव वृद्धींगत करणाऱ्या लोकांचा खास उल्लेख केला. या लोकांमुळेच मी समृद्ध झालोय आणि अजूनही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप काम करायचेय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत अस्वस्थ असते, असे सांगताना त्यांनी एका कवितेचा आवर्जून उल्लेख केला. कवीचे नाव मोतीराज राठोड असावे. त्यांची कविता आठवते. कवितेचे नाव होते ‘पाथरवट’. या कवितेत कवीने नेमके काय म्हटले आहे, त्याने कोणती वेदना मांडली आहे?, यांविषयी त्यांनी सांगितले.
कवितेतील भाव, कवीच्या वेदना सांगताना पवार भाषणात म्हणाले, कवी म्हणतो, हा मोठा दगड आम्ही घेतला. आमच्या घामाने, कष्टाने, हातोड्याने आणि हातातल्या छन्नीने त्या दगडाचे मूर्तीत रूपांतर केले आणि मूर्तीत रूपांतर केल्यानंतर सर्व गाव आले. मूर्ती बनविणाऱ्याकडे कुणी ढुंकून बघत नव्हते. सगळे गाव आले आणि गावाने वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात स्थापित केली. गंमत काय माझ्या घामाने मूर्ती तयार झाली, पण मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिरात मी दलित आहे, म्हणून मला आता प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचे प्रतिक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. त्या मूर्तीचा बापजादा मी आहे. मी असताना तुम्ही मला मंदिरात येऊ देत नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, खरे सांगतो अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वत: गुन्हेगार आहोत असे वाटते. आपण काही केले असो नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या उपेक्षित समाजावर जे अन्याय अत्याचार झाले, त्याची जी अस्वस्थता आहे, ती दुरुस्त करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, असे पवार म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …