हिंमत असेल, तर रिफायनरीचा प्रस्ताव राणेंनी रेटून दाखवावा – विनायक राऊत

सिंधुदुर्ग – सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व नारायण राणे पुन्हा आमनेसामने आले आहेत. रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी, तोंडवळी परिसरात सी वर्ल्डसाठी जमीन संपादन केली जाणार आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, तर सी वर्ल्डमुळे विस्थापित व्हावं लागणार असल्यानं स्थानिकांनी नाराजीचा सूर लावला आहे. शिवसेनेनं दोन्ही ठिकाणी स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळं शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा वाक्युद्ध सुरू झाले आहे.
सी वर्ल्ड आणि नाणार हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार. कुठलाही संबंध नसताना कोणीही काहीही बोलत असेल, तर त्याला काही अर्थ नाही, असा टोला राणे यांनी शिवसेनेला हाणला आहे. तर, प्रकल्पांच्या जागेला कडाडून विरोध करत हिंमत असेल, तर रिफायनरीचा प्रस्ताव नारायण राणेंनी रेटून दाखवावा, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.
नारायण राणे यांचा जीव सी वर्ल्डमध्ये गुंतलेला आहे. हा प्रकल्प फक्त ३०० एकर जागेवर होणार आहे; पण त्यासाठी १४०० एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेलं उभी करायची हा नारायण राणे यांचा धंदा आहे. मंत्री झाले असले, तरी ते त्यापासून दूर गेलेले नाहीत. त्यांचा हा प्रयत्न चालूच राहणार आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत गावं उद्ध्वस्त करून सी वर्ल्ड होऊ देणार नाही, असं राऊत म्हणाले.
नाणारच्या बाबतीतही राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली. नाणार रिफायनरी होऊ नये, म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी राणेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजप सरकारवर वाट्टेल ती टीका केली होती. आता सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना रिफायनरीचा कळवळा आलाय; पण हिंमत असेल, तर रिफायनरीचा प्रस्ताव नारायण राणेंनी रेटून दाखवावा, असं आव्हान राऊत यांनी दिलं.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …