हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा; राहुल गांधींची हिंदूंना साद

जयपूर – देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदूंची सत्ता आणा, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केले. देशातील वाढत्या महागाईिवरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या महारॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या रॅलीत बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या. रॅली जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या भोवती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले होते. रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्ही सर्व जण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेले आहेत. २०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले, पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात गेले. हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणे देणे नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेत असताना कधीच कुणापुढे झुकत नाही. मात्र, हिंदुत्ववादी हा सदा द्वेषाने पछाडलेला असतो, कारण त्याच्या मनात भीती असते, असे राहुल गांधी म्हणाले.
आपल्याला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही, तर सत्ता ग्रहणाचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करीत असतो. ते महादेवाप्रमाणे भयाचे प्राशन करतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गांधी आणि गोडसेंमधील फरकही समजावून सांगितला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एकसारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. मी हिंदू असून, मी अहिंसेवर विश्वास ठेवतो. केंद्र सरकार हिंदुत्ववादी असून, ते आपापसात हिंसाचार घडवत आहेत. ही मंडळी सत्तेसाठी काहीही करू शकतात, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
या देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा आहे हिंदुत्ववादी. हे दोन्ही शब्द एक नाहीत. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी होता, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त असल्याची टीका प्रियंका यांनी केली. मोदींनी सात वर्षांच्या कामाचा हिशोब द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …