ठळक बातम्या

हिंदुत्ववादी हिंसा पसरवतात, त्याची किंमत मात्र इतरांनाही मोजावी लागते – राहुल गांधी

नवी दिल्ली – उत्तराखंडमधील हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबरदरम्यान झालेल्या धर्मसंसदेवरून सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. धर्मसंसदेत वक्त्यांनी केलेल्या भडकावू आणि चिथावणीखोर भाषणांवरून विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्ववादी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवतात, त्याची किंमत मात्र, हिंदू-मुस्लीम-शीख-ईसाई अशा इतरांनाही मोजावी लागते, पण आता नाही! असे ट्विट करत राहुल गांधींनी हिंदुत्ववाद्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
धर्मसंसदेमध्ये दिलेल्या भाषणांबाबत राहुल गांधी यांनी दोन हॅशटॅगसह ट्विट केले आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हरिद्वारमधील ‘धर्म संसद’ हे ‘द्वेषपूर्ण भाषण संमेलन’ म्हणून संबोधले आहे, तसेच त्याचा निषेधही केला आहे. या परिषदेत सहभागी असलेल्या वक्त्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. धर्मसंसदेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने आपल्या पत्रात म्हटले आहे की, या परिषदेत सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे.
हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरून एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवैसी यांनी देखील केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. धर्मसंसदेतील वक्त्यांनी मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचे समर्थन करीत भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे दिली आहेत. याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या धर्ससंसदेत भाजप सरकारदेखील सामील असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनीही या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे.
एफआयआर दाखल
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याप्रकरणी आयोजक आणि वक्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. धर्म संसदेचा समारोप होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी उत्तराखंड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत याप्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी केवळ एका आरोपीचे नाव दिले आहे. हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार सिंह म्हणाले की, याप्रकरणी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …