बदलापूर – सोशल मीडियावरील एका ग्रुपमधील चर्चेला बळी पडून बदलापूर येथील एका १३ वर्षांच्या मुलाने थेट गोव्याला पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘वर्षभराने परत येतो’ असे सांगून संबंधित मुलगा रविवारी घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने संबंधित मुलाच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत सोमवारी संबंधित मुलाला शोधून काढले आहे. बदलापूर पूर्व भागातील रहिवासी असलेला हा १३ वर्षीय मुलगा थेट गोव्यात आढळल्यामुळे पोलीसही हादरले आहेत. संबंधित मुलगा सोशल मीडियावरील एका ग्रुपमधील चर्चेला बळी पडून गोव्याला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे; पण मुलाचे अपहरण झाले असावे, असा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास बदलापूर पूर्व पोलीस करीत आहेत.
संबंधित मुलगा ‘वर्षभराने घरी परत येतो’, असे सांगून घराबाहेर पडला होता. तो मस्करी करत असावा, असे घरच्यांना वाटले. पण तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. पोलीस तपास करीत असताना त्यांना ‘डिस्कॉर्ट’ या ऑनलाइन संकेतस्थळाची माहिती मिळाली. या संकेतस्थळावर ‘रनअवे अँड गेट अ लाइफ’ नावाचा ग्रुप आढळला.
या ग्रुपमध्ये घरातून पळून जाण्याबाबत चर्चा केली जात होती, तसेच घरातून पळून जाण्यासाठी विविध प्लॅन देखील येथे आखले जात होते. याच चर्चेला बळी पडून संबंधित मुलगा गोव्याला पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित मुलगा गोव्यातील कलंगुट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोव्याला जाऊन मुलाला ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …