सोलापूर – जसजशी महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतशी पोलीस प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तडीपारीच्या फाइल्सना वेग प्राप्त होत आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल व पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी बुधवारी सकाळी राजकीय क्षेत्राशी संबंध असणाऱ्या दोन व्यक्तींची तडीपारी करून गुन्हेगारीला चाप बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोलापूरचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांना तडकाफडकी तडीपार करण्यात आले आहे, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याचीही दोन वर्षांकरिता तडीपारी करण्यात आली. राजेश काळे यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये ते फरार होते, नंतर त्यांना अटक झाली. भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते.
उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले, तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यालाही दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. चेतन गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर राजेश काळे यांना पोलीस प्रशासनाने तडीपार केल्याने भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. राजेश काळे हे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …