उस्मानाबाद – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा जास्त समावेश आहे. सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांचा कोकणात
समुद्रकिनाऱ्याजवळ अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर अनिल परब यांना ईडी चौकशीला देखील सामोरे जावे लागले होते. यादरम्यान अनिल परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा केला होता. याच प्रकरणावरून अनिल परब यांनी सोमय्या यांना १०० कोटी रुपये द्या, नाहीतर माफी मागा, असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. परब शुक्रवारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिली.
कोकणात जे रिसॉर्ट आहे, त्याबद्दल त्यांना विचारले पाहिजे. मी वारंवार याबाबत खुलासा केलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडे याबाबत सर्व नोंदी आहेत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी याबाबत जो काही तपास केलेला आहे, त्यामध्ये ही गोष्ट अतिशय स्पष्ट झालेली आहे की, या रिसॉर्टशी माझा काहीच संबंध नाही. कागदोपत्री आयकर विभाग, ईडी सगळीकडे याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल मी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे. या दाव्यामध्ये एकतर त्यांना मला १०० कोटी द्यावे लागतील, नाहीतर माफी मागावी लागेल, असे अनिल परब म्हणाले. अनिल परब यांनी मंत्री असूनही बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले आणि त्याचा मालमत्ता करही भरला नाही, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …