ठळक बातम्या

साखर आयुक्तांचा दणका : एफआरपी थकविल्याने ‘ गाळपा’ चे परवाने रोखले

पुणे – राज्यात अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिल्याचे पाहायला मिळत आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही ४३ साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. या ४३ साखर कारखान्यांनी मिळून शेतकऱ्यांचा ३०० कोटींचा एफआरपी थकविला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार नाहीत, तोवर गाळप परवाना मिळणार नसल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये भाजपच्या नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साखर आयुक्त कार्यालयाने दणका दिला आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देणार नाही तोपर्यंत परवाना दिला जाणार नाही. ऊस बिलाचे धनादेश शेतकऱ्यांना दिले. मात्र, ते बाऊन्स झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी कारखान्यावर आंदोलन केले होते.
भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखला आहे. शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्याने परवाने रोखण्यात आले आहेत. एफआरपी द्या मगच परवाना मिळणार, असे साखर आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंकजा मुंडे (वैद्यनाथ कारखाना), रावसाहेब दानवे (रामेश्वर कारखाना), हर्षवर्धन पाटील (इंद्रेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना), राधाकृ ष्ण विखे पाटील (राहुरी कारखाना), धनंजय महाडिक (भीमा-टाकळी कारखाना), समाधान आवताडे (संत दामाजी कारखाना), संजय काका पाटील (यशवंत कारखाना आणि एसजीझेड, तासगाव), बबनराव पाचपुते (साईकृपा कारखाना) या भाजप नेत्यांच्या कारखान्यांचा परवाना रोखण्यात आला आहे. शिवसेनेचे तानाजीराव सावंत (भैरवनाथ शुगर), कल्याणराव काळे (चंद्रभागा कारखाना), दिग्वीजय बागल (मकाई कारखाना), माजी काँग्रेस आमदार दिलीप माने (सिद्धनाथ कारखाना) यांनाही साखर आयुक्तांनी दणका दिला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …