शाळा सुरू करण्याचा एकत्रित निर्णय राज्यस्तरावर घेणार – अजित पवार

पुणे – राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांतील शाळा सुरू, तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा १३ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे, तर औरंगाबाद महानगरपालिकेने १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहिल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले आहे. मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवडमधील शाळादेखील १५ डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आता बुधवारी राज्य पातळीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे विविध शहरांतील स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासंबंधी विचार सुरू आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली, तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेंतर्गत येणाऱ्या शहरातील शाळांबाबतचा निर्णय गुरुवारी (१० डिसेंबर) घेण्यात येणार होता, मात्र तो आणखी पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. शहरातील शाळा सुरू करण्याबाबचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा १५ डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरू होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …