मोदी सरकारचा मोठा निर्णय
मुंबई/नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शक्तिकांत दास आणखी तीन वर्षे भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)च्या गव्हर्नरपदी कायम राहणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्त समितीने गुरुवारी रात्री या निर्णयावर शिक्कामोर्तब के ले. शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून कामकाज पाहिले होते. ऊर्जित पटेल गव्हर्नर पदावरून पायउतार झाल्यानंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बँकेची सूत्रे सोपवण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.
शक्तिकांत दास यांना वित्त, कर, उद्योग या क्षेत्रांतील कामाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी विविध राज्यांमध्येही सरकारी पदावर काम केले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी लागू करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जो चमू तयार केला होता, त्यातील शक्तिकांत दास हे महत्त्वाचे अधिकारी होते. नोटाबंदीनंतर लहान-मोठे बदल, घोषणाही शक्तिकांत दास हेच करीत असत. नोटाबंदी नेमकी काय आहे, हेही जनतेला माध्यमांमधून दास यांनीच समजावून सांगितले होते. २६ फेब्रुवारी १९५७ रोजी ओडिशामध्ये जन्मलेले शक्तिकांत दास हे १९८० च्या बॅचचे तामिळनाडू कॅ डरचे आयएएस अधिकारी आहेत. ३५ वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी कर, उद्योग आणि आर्थिक विषयाशी संबंधित विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती.
आरबीआयमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांनी १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम केले होते. त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणूनही काम केले आहे. आठ केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता. शेरपा जी-२० मध्येही ते सदस्य होते. शक्तिकांत दास यांचा आरबीआय गव्हर्नर पदाचा सध्याचा कार्यकाळ १० डिसेंबर, २०२१ रोजी संपणार आहे. दास यांना तीन वर्षांसाठी पुन्हा आरबीआय गव्हर्नर पदावर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेल्याने आता ते १० डिसेंबर, २०२४ पर्यंत आरबीआय गव्हर्नर पदावर कायम राहणार आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …