मुंबई – रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल २१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या ८ महिन्यांत हा दंड वसूल केला गेला असून, मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वे मार्गावरील ही कारवाई आहे.
एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत रेल्वेकडून ५ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, कारवाईतून २१ कोटी रुपयांहून अधिकची दंडाची रक्कम वसूल केली आहे. गेले अनेक महिने अत्यावश्यक सेवा कर्मचाºयांना लोकल प्रवासाची मुभा असल्याने लोकलमधून अनेक जण नाईलाजास्तव विनातिकीट प्रवासाचाही प्रयत्न करत होते, तर काही प्रवासी अत्यावश्यक सेवा कर्मचाºयांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करत होते. रेल्वेच्या हे निदर्शनास आल्यानंतर विनातिकीट प्रवासी म्हणून ही कारवाई करण्यात आली. एकूण एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ५ लाख २७ हजार ६६३ विनातिकीट लोकल प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात मध्य रेल्वेवरील ३ लाख २० हजार १९९ प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून ११ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर पश्चिम रेल्वेवर २ लाख ७ हजार ४६४ विनातिकीट प्रवाशांकडून ९ कोटी ४२ लाख रुपये दंड वसूल केला.