विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने

मुंबई – नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापपर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. पावसाळी अधिवेशन विधानसभा उपाध्यक्षांच्या हजेरीत केल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्ष मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी हे मतदान गुप्त असायचे. मात्र आता गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवड करण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात ठाकरे सरकारला पत्र लिहिले होते. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? अशी देखील चर्चा होत होती. मात्र विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच असेल असे खासदार शरद पवारांनी देखील स्पष्ट केले होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा गेल्या अधिवेशनावेळी सुरू होती.
विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणे बंधनकारक असते. राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील त्याच्या आदल्या दिवशी अनुमोदक आणि अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला पाहिजे. शक्यतो सात दिवस आधी सदस्यांना कळवणे महत्त्वाचे असते, मात्र त्यात बदलही करता येतो. राज्यपालांनी ६ ही तारीख दिली तर ५ तारखेला फॉर्म भरून प्रक्रिया पार पाडता येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड नियम ६/३ प्रमाणे घेता येते. सर्व आमदारांना दोन तासांची वेळ मतदानासाठी दिली जाते. दोनपेक्षा जास्त उमेदवार आले तर ज्याला कमी मते आहेत त्यांना वगळून पुन्हा दोघांमध्ये निवडणूक होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …