वानखेडेंवरील नवाब मलिकांचे सर्व आरोप निराधार – आठवले

मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आठवले यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आघाडी उघडली असल्याचे आठवले म्हणाले. यावेळी आठवले यांनी वानखेडे कुटुंबीयांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी रविवारी रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांची आठवलेंशी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्याला त्यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे दाखवली, असे आठवले या भेटीनंतर म्हणाले.
वानखेडे कुटुंबीयांच्या भेटीनंतर आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात आता मोर्चा वळवला आहे, असे आठवले म्हणाले. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे असे असून, ते मुस्लीम कधीही नव्हते. त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केले हे खरे आहे. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केले आहे. त्यांनी सर्व कागदपत्रे आम्हाला दाखवली आहेत, असे सांगतानाच नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत, असे आवाहनही आठवले यांनी मलिक यांना केले आहे.
आठवलेंच्या भेटीनंतर क्रांती रेडकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. वानखेडे यांच्यावर ते रोज नवा आरोप करत आहेत. हे आरोप करत असताना ते काही कागदपत्रेही दाखवत आहेत, मात्र ते करत असलेले सर्व दावे आणि मांडत असलेले सर्व पुरावे खोटे आहेत, असा दावा अभिनेत्री रेडकर यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …