वानखेडेंच्या मुदतवाढीसाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्लीत लॉबिंग – नवाब मलिकांचा आरोप

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे आणि एनसीबीच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत समीर वानखेडेंसाठी लॉबिंग करीत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मलिक म्हणाले, मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. माझी माहिती आहे की, त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत लॉबिंग करीत आहेत. आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांनी म्हटले की, मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. मागील वर्षी फर्जीवाडा समोर आणला तसा या वर्षीही समोर आणणार आहे, असे ते म्हणाले.
मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील काही काळापासून हजारो करोडो रुपयांची वसुली सुरू आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती, त्याचे पुढे काय झाले? आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यावेळी न्यायालयाला मी हे देखील विचारले होते की, मला एनसीबी जर काही चुकीचे काही करीत असेल, तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का? तर त्याला हो असे उत्तर मिळाले होते, असे त्यांनी सांगितले. मलिक यांचे जावई समीर खान यांच्या जामिनाला एनसीबीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर २७ सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. नुकतेच एनसीबीने हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केले आहे. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केली.
अधिकारी-पंचांमधील ऑडिओ क्लिपही जाहीर
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप मलिक यांनी जाहीर केली आहे. याद्वारे मलिकांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याने एनसीबी कशा पद्धतीने फर्जीवाडा करीत आहे, हे सिद्ध होते असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …