वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला आरोग्य विभाग परीक्षेचा पेपर!

कुंपणानेच शेत खाल्ले!
पुणे – आरोग्य विभागाच्या पेपर फुटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच हा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.
बडगिरे यांनी त्यांच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर हा पेपर राज्यभर व्हायरल करण्यात आला. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत लातूरमधील आरोग्य विभागाचा सीईओ, बीडच्या मनोरुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी, उस्मानाबाद आरोग्य विभागाचा लिपिक आणि एक शिपाई यांना अटक केली आहे. लातूरच्या सीईओने पेपर फोडला आणि इतर सर्वांचा या पेपरफुटीच्या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता ११ झाली आहे.
आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ या वर्गासाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ परीक्षेचा पेपर परीक्षेआधी फोडून १०० पैकी ९२ प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांपूर्वीच जालन्यातून पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने २९ वर्षीय विजय प्रल्हाद मुराडे या तरुणाला जालन्यातून अटक केली होती. विजय प्रल्हाद मुराडे हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …