ठळक बातम्या

वरळी कोळीवाड्यात स्थानिकांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम

मुंबई – शिवसेनेचा आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. शनिवारी वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छीमारांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे सुरू असलेले काम बंद पाडले. मच्छीमारांची एकही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे, तसेच पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. मच्छीमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले होते, त्यामुळे कोळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि आरसीएफ तैनात करण्यात आले होते.
कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे, तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छीमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी समुद्रात काम सुरू असलेल्या बार्जवर जाऊन काम बंद पाडले. याआधी मच्छीमारांनी समतोल भूमिका घेत याबाबत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती; पण आता प्राधिकरणाच्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छीमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मच्छीमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका स्थानिक मच्छीमारांनी घेतली आहे.
मच्छीमारांची मुख्य मागणी ही मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची असून, प्राधिकरणाने त्याचे अंतर ६० मीटर ठेवण्याचे ठरवले आहे. जर यामुळे दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणत्याच विभागाने स्वीकारली नसल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.­
त्यामुळे शनिवारी मच्छीमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले. यावेळी मच्छीमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. यावेळी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत, त्यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात, असे कसे चालेल. आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांना घेऊन येतो, तुम्ही तुमचा प्रकल्प करा आणि आम्हाला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्थानिकांनी दिली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …