मुंबई - दिवसागणिक वाढणाऱ्या कोरो" />

लोकल प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत – आरोग्यमंत्री

मुंबई – दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकल्याचे बोलले जात आहे. अशातच मुंबईत लॉकडाऊन लागणार का?, तसेच निर्बंध कठोर होणार का?, यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जात असलेल्या मुंबई लोकलवर निर्बंध लावले जाणार का? अशी भीतीही मुंबईकरांना वाटत आहे, परंतु मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असली, तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे.
गुरुवारी मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून, मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले, तसेच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, शरद पवारांचा दररोज सर्वांशी संपर्क असतो. बुधवारी राज्यात २५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी कदाचित ३५ हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यासंदर्भात शरद पवार यांना अधिक माहिती घ्यायची होती. त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सध्याची परिस्थिती, त्यावरचे उपाय आणि काय निर्बंध लादले जाऊ शकतात याबाबत चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर खासगी सेवांमुळे जर संख्या वाढत असेल, तर त्याबाबतीतले निर्बंध अधिक वाढवण्याची गरज असेल, तर ते करावे, अशा संदर्भातील चर्चा झाली असे टोपे म्हणाले.
यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणताच विचार नाही, अशी माहिती दिली. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे यासंबंधीच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित कशी करता येईल, यासंबंधी शरद पवारांनी माहिती घेतली, असे राजेश टोपेंनी सांगितले. लसीकरण वाढवले पाहिजे यावरही बैठकीत एकमत झाल्याची माहितीही टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात नाइट कर्फ्यू किंवा विकेंड लॉकडाऊन लावण्यासंदर्भात कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भात केवळ चर्चा झाली. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतात असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …