‘लॉकडाऊन’ नको तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील – मुख्यमंत्री

मुंबई – दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार आढळून आला आहे. या विषाणूचा अधिक वेगाने प्रसार होत असून, तो अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, अशा सूचना प्रशासनला दिल्या आहेत. तसेच पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असे इशारावजा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील असे सांगून विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला राज्याचे आरोग्य सचिव, विभागीय आयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी सोमवारीही तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंधने घालावीत की नाही यावर सोमवारपर्यंत नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्यानंतर त्यांची तपासणी करावी की नाही याबाबत चर्चा झाल्याचे समजते. रविवारच्या बैठकीत दक्षिण आफ्रिका तसेच इतर युरोपियन राष्ट्रांतून येणाऱ्या विमान प्रवासी आणि त्यामुळे संभाव्य धोक्यावर चर्चा करण्यात आली.
शाळांबाबत ‘वेट अँड वॉच’
राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने या आधी घेतला होता. आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे योग्य ठरेल का? यावर चर्चा करण्यात आली आहे. शाळा उघडण्याबाबत काही आव्हाने आहेत, त्यावर देखील यात चर्चा झाली. शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमीका घ्यावी असे या बैठकीत ठरल्याचे समजते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …