लष्कर भरतीचा पेपर फुटल्याचे उघड

दोन माजी सैनिकांसह तिघांना बेड्या
पुणे – राज्यातील पेपरफुटीचे सत्र सुरूच असून, पुणे पोलिसांनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. यासाठी आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने महत्त्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईत दोन माजी सैनिकांसह एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या माजी सैनिकाने लष्कराच्या एका विभागातील व्हेइकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फोडल्याचे तपासात समोर आले आहे.
जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स अर्थात जीआरईएफ या विभागासाठी ही ३१ ऑक्टोबर, २०२१ ला भरती पार पडली. या भरतीत चाळीस परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले होते. त्यापैकी ३६ परीक्षार्थी पास होऊन त्या पदावर रुजू झाल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी निवृत्त लान्स नायक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आर्मी इंटिलिजन्स ब्युरोला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ४ जानेवारीला रक्षक चौकात सापळा रचला होता. गजानन मिसाळ आणि धनंजय वट्टमवार यांना तिन्ही आरोपींनी संगनमत करून भरतीचे आमिष दाखवले होते. लष्कराच्या जीआरईएफ विभागातील व्हेइकल मेकॅनिक पदासाठी ही भरती होणार होती. त्या पदाच्या भरतीसाठीची पाच लाख रुपयांची बोली ठरली होती. त्यानुसार पहिली टोकन रक्कम पिंपरी-चिंचवड परिसरात स्वीकारली जाणार होती. तीच सत्तर हजारांची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतले. मग पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाचारण करून त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडे लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता, ३१ ऑक्टोबरला झालेल्या भरतीचा पेपर फोडण्यात आल्याचे समोर आले. माजी सैनिकांकडे हे पेपर नेमके आले कुठून? याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …