रॅपीड अँटिजेनसाठी १००, तर आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये दर जाहीर

मुंबई – राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन दाखल झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लसीकरण आणि कोरोना चाचण्यावर भर दिला जात आहे. आता राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या २ वर्षांपासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून, आतापर्यंत किमान ५ ते ६ वेळा या चाचण्यांच्या दरांत राज्य शासनाने सुधारणा केली आहे. सुधारित दरानुसार केवळ ३५० रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले.
शासनाने याबाबत मंगळवारी निर्णय जारी केला असून, आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये, तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. अँटिबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५०० असे दर ठरविण्यात आले आहेत. रॅपीड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी १२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …