राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे पुण्यात निधन

मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचेही मंगळवारी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने पुण्यात निधन झाले. राजेश पिंजाणी हे मूळचे नागपूरचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘बाबू बँड बाजा’ सारख्या चित्रपटामधून समाजाचे वास्तविक दर्शन दाखवणाऱ्या दिग्दर्शकाच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हळहळ व्यक्त करीत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत पिंजाणी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. राजेश पिंजाणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर २०२१ या वर्षाला निरोप देत २०२२ च्या स्वागताची पोस्ट केली होती. त्याला गूड बाय अँड वेलकम…..!!! असे कॅप्शनदेखील देण्यात आले होते.
राजेश पिंजाणी यांना ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पिंजाणी यांनी ‘बाबू बँड बाजा’च्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातले दु:ख मांडले होते. या चित्रपटात एका बँडवाल्याचे आयुष्य नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आरसाच आपल्याला पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटातील बँडवाल्याची प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली होती, तर त्यांच्यासोबत मिताली जगताप-वराडकर, विवेक चाबुकस्वार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …