राष्ट्रवादी मलिक यांच्या पाठिशी – छगन भुजबळ

पुणे – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुण्यात आहेत. छगन भुजबळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबई ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केले. ज्याने इतरांना जेलमध्ये टाकले त्याच्या मागे आता कोर्टकचेऱ्या लागतील, असा टोला छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंब मुस्लीम आहे, असे सिद्ध झालेय, असेही छगन भुजबळ म्हणाले. आर्यन खान प्रकरण, समीर वानखेडे, के. पी. गोसावी प्रकरणी नवाब मलिक जी भूमिका मांडत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे, पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असेही ते म्हणाले.
आर्यन खानला जामीन मिळाला आहे. ज्याने त्याला पकडले, त्याने कायद्याच्या विरोधात काम केले. तो अडचणीत आलाय, असे भुजबळ म्हणाले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत हे निकाहनाम्यावरून सिद्ध झाले आहे. नवाब मलिक देखील मुस्लीम आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे, असे भुजबळ म्हणाले. भाजप विरोधी सरकार जिथे जिथे आहेत, तिथे तपास यंत्रणा चुकीचे काम करीत आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांनी संयम बाळगळा पाहिजे, सरकार त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आर्यन खानचा जामीन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचा एकमेकांशी काही संबंध नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देतच आहे, असे प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी भाजपला दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार लक्ष देत आहे. शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. भारत सरकारच्या तपासयंत्रणा भाजपविरोधी सरकार असतील तिथे अतिरेक करीत आहेत. चुकीचे अधिकारी चुकीचे काम करीत आहेत. शेतकरी महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराष्ट्र हा विमानतळ, गोद्या, जेट्टींसाठी प्रसिद्ध आहे, तसा तो बॉलीवूडसाठीही प्रसिद्ध आहे. बॉलीवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप महाविकास आघाडी सरकारविषयी जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही भुजबळांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …