राज ठाकरेंविरोधात परळी कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट

२००८ मधील एसटी बस दगडफेकप्रकरणी कारवाई
परळ (बीड) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. जामीन करूनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने हे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. २००८ साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.
जवळपास १३-१४ वर्षे जुन्या खटल्यात आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. बीडमधील परळीत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते. दुष्काळानिमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी तीनशे रुपयांचा दंड भरत अटक वॉरंट रद्द केले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.
रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. या अटकेविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती. बसेसवर दगडफेक झाली होती. असाच प्रकार परळीमध्ये सुद्धा घडला होता. धर्मापुरी पॉइंट येथेसुद्धा एसटी बसेसवर दगडफेक झाली होती, ज्यामध्ये एसटीचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व चिथावणीखोर वक्तव्ये करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यानंतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता, तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …