ठळक बातम्या

राज्य सरकारला अनेक समस्यांचे गांभीर्यच नाही – डॉ. भारती पवार

कोल्हापूर – आरोग्य विभागातील पेपरफुटी असो किंवा कोरोना काळातील आरोग्य साहित्याचा घोटाळा, राज्यात नेमके चाललेय काय? हेच समजत नसून, राज्य सरकार अनेक प्रश्नांबाबत अद्यापही गंभीर नाही. राज्याच्या या पद्धतीमुळे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन तक्रारी वाढल्यास केंद्र सरकार नक्कीच यामध्ये लक्ष घालेल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रविवारी येथे केले. त्या शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, भगवान काटे, गायत्री राऊत, विजय जाधव, विजय अग्रवाल उपस्थित होते.
मंत्री पवार म्हणाल्या, कोरोना संकट काळात केंद्राने राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याला भरीव मदत केली. जिल्ह्याला १०२ व्हेंटिलेटर, तसेच २०२१-२२ ला मोठे बजेट उपलब्ध झाले; परंतु राज्य सरकार मात्र प्रश्नांबाबत अद्यापही गंभीर दिसत नाही. पेपरफुटी, परीक्षा विलंब, घोटाळे यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असून, तक्रारी वाढल्या तर केंद्राला याकडे लक्ष घालावे लागेल. ओमिक्रॉनबाबत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. केरळ-महाराष्ट्र या राज्यांमध्ये वाढणाऱ्या केसेस चिंतेचे कारण असून, राजकारण न करता याचा सामना सर्वांनी केला पाहिजे. विद्यार्थी लसीकरणाबाबत सुयोग्य नियोजन केले आहे. कोरोना काळात केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केली होती. आताही केंद्र पाठीशी आहे; पण स्थानिक स्तरावर व्यवस्थापनाचे काम राज्य सरकारचे असून, त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.
आरोग्य विभागाची घेतली शाळा
रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर ते मी कधीच सहन करणार नाही. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय राखत नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा द्याव्यात, अशा कडक शब्दांत डॉ. भारती पवार यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांची जणू शाळाच घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा एकमेकांशी समन्वय नाही हे योग्य नाही. कोरोना काळात रुग्णांची झालेली हेळसांड चुकीची आहे. केंद्र सरकारने आरोग्य विभागासाठी आणलेल्या नवनवीन योजनांचा पाठपुरावा करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम आरोग्य विभागाने केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …