राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपचे १ लाख कार्यकर्ते लावणार काळ्या फिती

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या हाती सरकारी मदतीचा एक पैसाही पडलेला नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भाजपचे महाराष्ट्रातील एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून आंदोलन करतील, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळाने वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही, अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजी केली, पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही, याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकले नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच नाही. सेलिब्रिटींच्या बचावासाठी सरकारमधील मंत्र्यांची कारकीर्द पणाला लावून त्यांच्यासाठी कामे बाजूला ठेवून किल्ला लढविणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवालही उपाध्ये यांनी केला. १३ ऑक्टोबरला ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा केला. अजूनही त्यापैकी एक पैसाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. केवळ संकटग्रस्त भागांचे दौरे करणे, मदतीच्या घोषणा करणे यात काही अर्थ नाही, असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यांना आपल्या या वाक्याची आठवण असेल व थोडीशी लाज असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीमधून किती शेतकऱ्यांना लाभ झाला, कोणाकडे पैसा पोहोचला, याचा संपूर्ण राज्याचा तपशील जनतेसमोर उघड करावा, असे आव्हान उपाध्ये यांनी दिले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …