ठळक बातम्या

राज्यावर पुन्हा निर्बंधांचे सावट!

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे
मुंबई – मागील काही दिवसांत कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काहीशी आटोक्यात असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता लक्षणीय होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. यावेळी १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण, निर्बंध आणि ओमिक्रॉनवरील उपचारपद्धती अशा साऱ्याबाबत महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (३० डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि टास्क फोर्सचे पदाधिकारी यांची दोन तास बैठक झाली. यावेळी कोरोनासंबंधी विविध गोष्टींवर चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, ओमिक्रॉनचे संकट, लसीकरण इत्यादींवर चर्चा झाली असून, निर्बंध आणि पुढील उपाययोजनेसंबंधी माहिती मुख्यमंत्री येत्या एक-दोन दिवसांतच निर्णय घेऊन सांगतील, असे टोपे म्हणाले.
गुरुवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. दिवभरात राज्यात ५ हजार ३६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. गर्दी टाळलीच पाहिजे, कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंगसंदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे, त्यातून ओमिक्रॉनचे निदान होते. ते किट वापरावे, त्यामुळे डेल्टा किती आणि ओमिक्रॉनचे रुग्ण किती हे समजेल. ट्रिटमेंटवर मोल्नोपिरावीर ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सने मान्य केलेले अँटी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. लसीकरणापासून वंचित असलेल्यांचे लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत, त्यांना सूचना केल्या जाणार आहेत. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकेच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारे वर्ष असावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो, असे सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही कार्य करू नका, कोरोना नियमावलीचे पालन करा असे आवाहन टोपे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर या वयोगटातील मुले शाळा आणि महाविद्यालयांत जात असून त्यामुळे शाळा, महविद्यालय बंद होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत बोलताना सध्या तरी शाळा बंद होणार नसून, लसीकरण शाळेत न घेता मुलांना गटा-गटाने लसीकरणासाठी नेले जाईल, यावेळी सर्व महत्त्वाची काळजी घेतली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …