पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे संकेत
मुंबई – राज्यात सरसकट शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां (सीईओ)सोबत ऑनलाइन बैठक घेतली. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ग्रीन सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आता सरसकट शाळा सुरू करण्याचा विचार करत असल्याचे कळते.
कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या आहेत. कोरोनाचे संकट दूर होताना दिसत आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सुरू झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा, त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी घेतला.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून, यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. हा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी दिले. बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …