राज्यात संरक्षण आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटले

ऑडीओ क्लीप झाली व्हायरल
रायगड, पुणे, पिंपरी चिंचवडात पेपरफुटी
पैसे उकळणाऱ्या एजंटला अटक
पुणे – महाराष्ट्रात अनेक शासकीय प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या एका ऑडीओ क्लिपमध्ये एक अनोळखी व्यक्ती परीक्षेच्या उमेदवाराशी बोलत असून, परीक्षेच्या पेपरबाबत चर्चा होत आहे आणि त्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याबाबत चर्चा केली जात आहे. हा फोन पिंपरी-चिंचवड किंवा पुणे शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गटाने महाराष्ट्रात एक नव्हे, तर अनेक परीक्षांचे पेपर लीक केले आहेत. या पेपर फुटीमध्ये आरोग्य विभाग परीक्षा, लष्कर परीक्षा, पोलीस भरती आणि इतर परीक्षांचा समावेश आहे.
रायगड, पिंपरी-चिंचवड, पुणे, नायगाव या भागांत पेपर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. या परीक्षा या वर्षीच घेण्यात आल्या होत्या. ज्या परीक्षांचे पेपर या गटाने लीक केले, त्यामध्ये राष्ट्रीय सैन्य भरती परीक्षा आणि महाराष्ट्रात या महिन्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेत. महाराष्ट्रात अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर या महिन्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या; पण परीक्षेचे पेपर फुटले आणि एका पेपरसाठी लोकांनी हजारो रुपये मोजले. याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती कशी नव्हती, ही धक्कादायक बाब आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणे (आर्मी इंटेलिजन्स)ने अटक केलेल्या लष्करातील हवालदार अनिल चव्हाणके याच्या ऑडीओ क्लिपमधून या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे पोलीस याबाबत घोटाळा नसल्याचा दावा करीत असताना, समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस नेमके काय दडवण्याचा प्रयत्न करीत आहेत?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
३१ ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यावर २७ नोव्हेंबरला पुणे सायबर सेलकडे याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र सैन्य भरती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्मी इंटेलिजन्सला ८ नोव्हेंबरलाच हा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा छडा लागला होता. त्याचबरोबर या टोळीकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरतीचा पेपरही फोडण्यात येणार असल्याचे आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून साडेबारा लाख रुपये घेण्यात येणार असल्याचे आर्मी इंटेलिजन्सला समजले.
आर्मी इंटेलिजन्सला ही माहिती आर्मीत हवालदार, म्हणून काम करणाऱ्या अनिल चव्हाणके यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधून मिळाली होती. ही माहिती आर्मी इंटेलिजन्सने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि आर्मी इंटेलिन्जसने ९ नोव्हेंबरला लगेच नाशिकहून अनिल चव्हाणके, सांगलीहून त्याचा साथीदार प्रवीण पाटील आणि पुण्यातून महेश वैद्यला अटक केली; मात्र आता पिंपरी-चिंचवड पोलीस त्यांच्या तपासात आरोग्य विभागात कोणताही घोटाळा झालाच नसल्याचा दावा करीत आहेत. फक्त सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एजंटला आपण अटक केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …