राज्यात तूर्तास ‘लॉकडाऊन’ नाही!

* आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती  * अजित पवारांच्या उपस्थितीत निर्णय
मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विलगीकरण (क्वारंटाइन) कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की, लावू नये आदींबाबत मोठे निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही, तर अँटिजेन चाचणीवर आपण भर देणार आहोत. अँटिजेन चाचण्या वाढवाव्या लागतील. अँटिजेन चाचणी किट खरेदी केली, तर त्याचा हिशेब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या ३० हजारांपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाची आरटीपीसीआर केल्यास ताण पडेल. दीड ते पावणेदोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहेत. रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार असून, अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्कद्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्वारंटाइनचा कालावधी सात दिवसांचा करण्यात आला आहे. या आधी हा कालावधी १० दिवसांचा होता. सात दिवसांच्या होम क्वारंटाइननंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनची सध्या गरज नाही, पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावा लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला या बैठकीत दिल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …