ठळक बातम्या

राज्यातील हिंसाचाराला राज्य सरकारचीच फूस – सोमय्या

विदर्भातील मंत्र्यासह चौघांचे
घोटाळे लवकरच उघड करणार
अमरावती – विदर्भातील एका मंत्र्यासह चार मंत्री तथा नेत्यांचे घोटाळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत उघड होतील, अशा शब्दांत आणखी एक गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी येथे केला. शहरातील हिंसाचाऱ्याच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या दौऱ्यावर होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीसह इतर काही जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचाराला राज्य सरकारचीच फूस होती. अमरावतीत हजारो लोक रस्त्यांवर आले होते. त्यावेळी पोलिसांना तात्काळ सूचना गेल्या. हे होऊ द्या, असे पोलिसांना सांगितले गेले असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी दौऱ्यादरम्यान अमरावती हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारावरून सोमय्या यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हजारो लोक रस्त्यांवर गुपचूप येऊ शकतच नाहीत. पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या, असा दावा सोमय्या यांनी केला.
आघाडी सरकार १२ तारखेचा हिशोब का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या घटनेचा शोध का घेत नाहीत?, असाही सवाल त्यांनी केला. १९९२-९३ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने जे केले, त्याचीच पुनरावृत्ती ठाकरे सरकार करीत आहे, असा घणाघात सोमय्या यांनी केला. राज्य सरकारमधील डझनभर मंत्री व नेते एक तर कारागृहात आहेत किंवा कारागृहात जाणार आहेत. मी आणखी चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत संबंधित तपास यंत्रणांकडे तक्रार केली आहे. महिनाभरात हे घोटाळे उघड होतील. या चार जणांमध्ये दोघे जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मित्रपरिवारातील नेते आहेत, तसेच उर्वरितांमध्ये दोन मंत्री असून, त्यातही एक विदर्भातील काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …