राज्यस्तरीय कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध

मुंबई – ‘हसावी गादी बाराच्या आधी भांडण मिटवावं… अन् प्रीतीच्या फुला तरी तू मला वेळेला उठवावं…’ या लोकनायक वामनदादा कर्डक यांच्या गीताचे लोकशाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या बुलंद आवाजात केलेले सादरीकरण… ‘वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले, एका अदृश्य कोरोनाने जगण्याचे भान दिले,’ म्हणत ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी वर्तमानावर केलेल्या भाष्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी मुंबई येथे लोकनायक वामनदादा कर्डक काव्यनगरीत कविवर्य नारायण सुर्वे मंचावर शनिवारी पार पडलेल्या कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
‘विरसता येत नाही, असे नसतेच काही’ म्हणत अरुण म्हात्रे यांनी रसिकांना भावनांच्या विश्वात नेले. ‘कविला नेहमी एकटंच बोलू द्यावे, त्याने बोलत जावे आणि आपण ऐकत राहवे…’ म्हणत प्रसाद कुलकर्णी यांनी रसिक प्रेक्षकांना दिलेली दाद… ‘व्हती झाडाले टांगेल हसरी नाचरी दोरी, कशा हिंदळत होत्या पोरी, गं माय व पोरी’ म्हणत प्रा. प्रशांत मोरे यांनी महिलांच्या विश्वात नेऊन सोडले… ‘इतना सन्नाटा क्यो है भाई’ या कवितेच्या माध्यमातून किरण येले यांनी समाजाने ज्वलंत प्रश्नांवर बोलले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, करा संरक्षण तुमच्या परमपुज्य संस्कृतीचे, तर यांनी सॉक्रेटिसच्या डोक्याला घोडा लावून काढली रांगोळी रक्ताच्या थारोळ्यात, असं म्हणत कवयित्री नीरजा यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी त्यांच्या आजीने शब्दबद्ध केलेली ‘मी कुसुमाग्रजांची आई’ ही कविता सादर केली.
यावेळी कामगार कवी सागर चारी (तूच सांग देवा आता), शिवहरेश परब (जीवनाच्या नाण्याला दोन बाजू), संजय गोरडे (माज्याच मनगटावर माझी मदार आहे… मी कामगार आहे, मी कामगार आहे), जगदीश मागाडे (तुझ्याच वाटेवरून), विजयकुमार पांचाळ (हे अश्रू कुणाचे), प्रदीत येसनकर (बाप), लीलाधर दवंडे (मी कामगार आहे) यांनीदेखील कविता सादर केल्या. कवी अरुण म्हात्रे यांनी मान्यवर कवींच्या कविता पेरत संमेलनात बहार आणली. लोकशाहीर डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या अजरामर गीताने (छक्कड) संमेलनाची सांगता झाली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …