म्हाडा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान

सुधारित वेळापत्रक जाहीर
पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१-२२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी यादरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाइन परीक्षा होणार आहे, यापूर्वी २९ आणि ३० जानेवारीला ही परीक्षा होणार होती, मात्र त्याच दिवशी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा (एमपीएससी)कडून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) मुख्य परीक्षा होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर म्हाडा भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
म्हाडा व महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याचे लक्षात येताच म्हाडाने आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला. म्हाडाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हाडाची कल्स्टर ६ मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक या संवर्गाकरिता २९ व ३० जानेवारी २०२२ रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा आता ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या तीन दिवसांत सकाळी ९ ते ११, १२:३० ते २:३० व ४ ते ६ अशा परीक्षांच्या वेळा असतील, असे या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
राज्यात १२ डिसेंबर रोजी म्हाडाच्या ५६५ जागांसाठी परीक्षा होणार होती, मात्र परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. तशी काही उदाहरणेदेखील समोर आली होती. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्याच वेळी परीक्षेची नवी तारीख जाहीर करू असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार या परीक्षांसाठी २९ व ३० जानेवारी या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या, मात्र एमपीएससी आणि म्हाडा परीक्षेचे पेपर एकाच दिवशी होणार असल्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पेपरफुटी प्रकरणामुळे गतवर्षी होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २९ जानेवारी रोजी होणार होती, परंतु एमपीएससीची पोलीस निरीक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी होणार आहे. त्यामुळे म्हाडा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हाडा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. म्हाडाच्या अधिकृ त संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …