मुस्लीम महिलांची ऑनलाइन बदनामी : राज्य महिला आयोगाकडून दखल; कारवाईचे निर्देश

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ‘सुल्ली डील’ ॲपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करून त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरून काढून टाकण्यात यावी, अशी मागणी केली आहे, तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी सायबर सेलला दिले आहेत.
समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत, असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाजमाध्यमांवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी, तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
मुस्लीम महिलांचे फोटो ऑनलाइन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दिल्लीत एका महिलेने असे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे.
कठोर कारवाईचे आदेश
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील ॲपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे, तसेच सीआयडी मुंबई येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी आहे. याचा तपास करून पुढील कारवाई तातडीने केली जाईल, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली आहे.
अमित शहांना पत्र लिहिणार – मलिक
मुंबई – ऑनलाइन पोर्टलवर महिलांची बदनामी करण्यात येत असून, हा मोठा गुन्हा आहे. याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. याआधीही असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक म्हणाले. या प्रकरणामध्ये मुंबईतील काही मुलीदेखील असल्याचे मलिक यांनी सांगितले. मुलींबद्दल वादग्रस्त मजकूर लिहून त्यांचे फोटो शेअर करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा करून दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सरकारविरोधात भूमिका मांडल्यामुळे मुलींचे फोटे चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आले होते. केंद्र सरकारचे समर्थक अशी काही पोर्टल चालवत असून, त्यांच्याकडून पाठराखण होत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून जर दोषींवर कारवाई होत नसेल, तर महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील, असे मलिक यावेळी म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …