मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’ वर; रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तब्बल २२ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थित राहणे टाळले होते, तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १० नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला होता. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि पुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली. साधारण १० वाजून ३४ मिनिटांनी मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह रुग्णालयातून बाहेर पडले. गिरगाव ते ‘वर्षा’ बंगला हे जवळपास चार किमीचे अंतर त्यांनी आठ मिनिटांत पार केले. मुख्यमंत्र्यांचा ताफा १० वाजून ४२ मिनिटांनी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …