मुंबई-पुण्यातील शाळांची घंटा १५ डिसेंबरला वाजणार

मुंबई/पुणे – राज्य सरकारने १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केली असून, तसा निर्णयही जारी केला आहे; मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे शहरांतील शाळांची घंटा १५ डिसेंबरलाच वाजणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेने याबाबतचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिली ते सातवीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत. मुंबई महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मुंबईतील पालकदेखील शाळा सुरू करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. पालिकेचे शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.
मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनेही शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचे चित्र दिसून आले होते. अखेर महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …