मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण

मुंबई – मुंबईसह राज्यात सर्वत्र बुधवारी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून, शेतपिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये सकाळपासूनच पावसाने धुमशान घातले. मुंबई आणि ठाण्याला यलो ॲलर्ट देण्यात आलाय, तर पालघरला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. परळ, लोअर परेल, गोरेगाव, मालाड भागात चांगलाच पाऊस झाला. सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केल्याने छत्री आणि रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघर, बोईसर, डहाणू भागात संततधार पाऊस झाला. वसई-विरारच्या काही भागात हलका पाऊस पडला, तर नालासोपारा पूर्व येथील संयुक्त नगर परिसरात पाऊस झाला. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबारमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या.
औरंगाबाद शहरासह, ग्रामीण भागात, तसेच मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागालाही बदललेल्या हवामानाचा फटका बसला. औरंगाबादमधील कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसेल. पुढील तीन दिवस, म्हणजेच ४ डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड-रत्नागिरीत पावसाच्या सरी कोसळल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …