पालक मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती
मुंबई – मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (३१ डिसेंबरच्या रात्री) आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्ट्या रद्द करण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाशी संबंधित माहिती दिली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात येणार नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. शाळा, महाविद्यालये कोरोनामुळे बंद ठेवण्याबाबत एक धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक किंवा डॉक्टरांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल, असे ते म्हणाले.
सध्या मुंबईत ५८ हजार खाटा उपलब्ध असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली, मात्र नागरिकांनी गरज असल्याशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे सांगून लक्षणे नसलेले रुग्ण आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत सोशल मीडियावरील अथवा इतरांचे ऐकण्यापेक्षा डॉक्टर, तज्ज्ञांचे मत लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाईल. ३१ डिसेंबर किंवा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करू नयेत, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …