ठळक बातम्या

‘महाविकास आघाडी’ सरकारमुळे महाराष्ट्र अडचणीत – विनायक मेटे

नाशिक – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेटे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. कोरोनाचे संकट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल, अशी अनेक संकटे या सरकारच्या काळात आली. हे सरकार पालथ्या पायाचे सरकार आहे. त्यामुळे राज्य अडचणीत आले आहे, असा घणाघात विनायक मेटे यांनी केला.
सरकार आणि वीमा कंपन्यांचे साटेलोटे आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे पैसे मिळत नाहीत. राज्य सरकार ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वीज तोडत आहे. सभागृहात एक बोलायचे आणि प्रत्यक्षात वेगळे वागायचे, असा विश्वासघात सरकार करीत आले आहे. विश्वासघात हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव आहे. प्रत्येक घटकांचा या सरकारने विश्वासघात केला. या सरकारला शिवाजी महाराज स्मारकासाठी दोन वर्षांत दोन मिनिटेदेखील यासाठी वेळ देता आलेला नाही. मंत्री अशोक चव्हाण तोंड बंद करून बसले, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
नाशिकमध्ये ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनावर सुरू असलेल्या वादांवरही विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. साहित्य संमेलनाचा इतिहास खूप मोठा आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, प्रेक्षकांमध्ये बसले होते. राजकारण होऊ नये, म्हणून अलीकडच्या काळात साहित्य संमेलनात राजकारण वाढले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ स्वागत अध्यक्ष झाल्याने असे होणारच होते. पालकमंत्री पावभाजी खायला थोडी केले आहेत, असे मेटे म्हणाले. भाजपची सत्ता असलेल्यांनी पैसे दिले ते चालते, मग नाव का चालत नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीतले आहेत. मग त्यांचे नाव घेताना तुम्हाला लाज का वाटते?, तुम्ही त्यांचे गुणगाण गाता, त्यांच्यावर पुस्तके लिहिता. भाषणे ठोकता, व्याख्याने देता. मग त्यांचे नाव घेताना तुम्हाला नको वाटते का?, असा सवाल करून ते आपल्या देशाचे अभिमान आहेत, महापुरुषांचा आदरच केला पाहिजे, असेदेखील विनायक मेटे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षण घालवले
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. केवळ एका बोलघेवड्या मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले, असा हल्लाबोल विनायक मेटे यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचे आणि अपशकुनी आहे. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहीत नाही; मात्र त्यामुळे लोक देशोधडीला लागले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …