महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यात सुधारणा; दंडात वाढ

नो-पार्किंगसाठी ५००, तर ट्रिपल सीटसाठी हजार रुपये भरावे लागणार
मुंबई – महाराष्ट्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली असून, आता राज्यभरातील विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत राज्याने दंडाच्या वाढीची अधिसूचना जारी केली आहे. १ डिसेंबरपासून ही अधिसूचना राज्यात लागू झाली आहे. दंडाच्या रकमेतील वाढीमुळे लोक रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त होतील आणि ते सुरक्षितपणे वाहन चालवतील. यामुळे सुरक्षा तर सुधारेलच पण रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सुधारित नियमांनुसार, दुचाकीवर हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास ठोठावला जात असलेल्या ५०० रुपयांच्या दंडात बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या वेळी उल्लंघन केल्यास ५०० रुपयेच दंड असेल, परंतु दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास हा दंड १५०० रुपये असेल. दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठीचा दंड २०० रुपयांवरून थेट हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. आधी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी धोकादायक/बेपर्वा वाहन चालवल्याबद्दल हजार रुपये दंड होता, पण आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे आणि आता दुचाकीसाठी हजार रुपये आणि इतर वाहनांसाठी २ हजार रुपये दंड आकारला जाईल.
तर, वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलण्याचा दंड २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. हॉर्न वाजवल्यास दंड ५०० रुपयांवरून हजार रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, फॅन्सी नंबर प्लेटसाठी आधी हजार रुपये दंड होता, तर सुधारित दंड पहिल्या उल्लंघनासाठी ५०० रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी १५०० रुपये आहे, तर हायस्पीड ड्रायव्हिंगसाठी आता ५ हजार रुपये आणि परमिटशिवाय गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …