ठळक बातम्या

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी ‘कन्नड’ संघटना आक्रमक; आज बंद

बेळगावमधील मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा
बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड संघटनांनी शुक्रवारी (३१ डिसेंबर) बंदची हाक दिली आहे. बंगळुरू येथे तीसहून अधिक कन्नड संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. कन्नड संघटनेचा वाटाळ नागराज याने बैठक झाल्यावर सगळ्या कन्नड संघटनांच्या वतीने बंदची घोषणा केली. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. या बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन तो यशस्वी करावा. आजवरच्या बंदपेक्षा हा बंद वेगळा आहे. कन्नड जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे, असेही वाटाळ नागराज म्हणाला.
सीमाभागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्नाटक सरकारने याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या चौकटीत चौकशी करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कर्नाटक पोलिसांनी बेळगावमधील मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहाचा (कलम १२३-अ) गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक सरकारच्या या अरेरावीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर बेळगावातील धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, खडेबाजार पोलीस ठाणे, छावणी पोलीस ठाणे, टिळकवाडी पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलीस ठाणे येथे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण ३८ मराठी भाषिकांना अटक करून कारागृहात टाकले आहे, तर २३ हून अधिक जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …