महाराष्ट्रात ‘ ओमिक्रॉन’ चे २८ संशयित – आरोग्यमंत्री

जालना – शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनची लागण झालेले २ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८०० जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) साठी पाठवण्यात आले आहेत.
ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे खबरदारी घेतली जात असून, मुंबई विमानतळावर आतपर्यंत ८०० जणांच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) साठी पाठवण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात १२ तर पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये १६ असे एकूण २८ नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) साठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीत. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नसल्याचेही टोपे म्हणाले.
अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कर्नाटक सीमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल, असे टोपे म्हणाले. याशिवाय नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत जगातील ३० पेक्षा अधिक देशांत ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच सरकारने केलेले नियम पाळावेत, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …