ठळक बातम्या

महाराष्ट्रातील शाळांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

तारखांबाबत मात्र शिक्षकांमध्ये संभ्रम
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण १४ दिवसांच्या सुट्टीची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्याबरोबर त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून दिवाळी सुट्टीची माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा ४ ऑक्टोबर २०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सवासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना २८ ऑक्टोबर २०२१ ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना दिवाळीसाठी १ ते २३ नोव्हेंबर, अशा २० दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच २१ नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे २२ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. यासोबतच शाळांना जर नाताळाच्या सुट्ट्या द्यायच्या असतील, तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कमी करून नियोजन करावे, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत, परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांवरून शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्या परिपत्रकानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे नमूद आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या कधी आणि कशा द्यायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे. ऐनवेळी म्हणजेच सुट्ट्या जाहीर करण्याच्या एक दिवस आधी परिपत्रक काढल्याने हा गोंधळ वाढला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …