मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरील ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावता येणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणत्याही सभा, मोर्चे आणि आंदोलन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना ६ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी परिसरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणदेखील करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूचा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे, असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मार्गदर्शक या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करण्यास नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून, डॉ. आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाच्या वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तपासणीअंती ज्यांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …