ठळक बातम्या

ममता बॅनर्जी मुंबईत : आज पवारांशी भेट

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. मुंबई विमानतळावर उतरताच ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा दिला. त्यांच्या या नाऱ्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपविरोधी पक्ष एकत्र येतात का?, त्यामध्ये ममतांचा पक्ष राज्यातील निवडणुका लढवणार का?, याची उत्सुकता आहे. ममता बॅनर्जी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. ममता बॅनर्जी यांची मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी भेट झाली. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
ममता बॅनर्जींनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून, प्रार्थना करण्यासाठी येथे आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असे म्हणत ‘जय मराठा, जय बांगला’ असा नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टींचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावेळी राज्यातील उद्योगपतींच्या भेटीगाठी घेणार आहेत. बुधवारी दुपारी चार वाजता त्यांची मुंबईतील उद्योगपतींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंची भेट नाही
ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर दुसरी मोठी भेट ही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती, मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे रुग्णालयामध्ये असल्यामुळे ही भेट होणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृ तीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती, पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे ही भेट होत नाही, असे ट्विट राऊत यांनी केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …