ठळक बातम्या

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयात आग; ७ बालकांचा होरपळून मृत्यू


भोपाळ – महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग लागल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुद्धा अशाच हृदयद्रावक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. भोपाळस्थित कमला नेहरू बाल रुग्णालयाच्या नवजात शिशू अति दक्षता विभागात (एनआयसीयू) सोमवारी रात्री अचानक आग लागल्याने ७ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कमला नेहरू बाल रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री ९च्या सुमारास आगडोंब उसळला. याच मजल्यावर ‘एनआयसीयू’ विभाग असून, आगीमुळे त्यातील ७ नवजात शिशू मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. सर्व मृत शिशू अवघ्या एका महिन्याचे होते. आगीचा भडका उडाल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी पळ काढला. त्यामुळे बालकांना सुरक्षित बाहेर काढण्याची तसदी कोणीही घेतली नाही. या घटनेचे वृत्त कळताच इतर कर्मचारी तत्काळ तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी ४० पैकी ३३ नवजात शिशूंना बाहेर काढून इतरत्र हलविले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे १० बंब मागविण्यात आले. अथक परिश्रमाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागल्यानंतर तेथील परिचारिकेने दरवाजा उघडला नाही. अन्यथा बालकांचे प्राण वाचविण्यात यश आले असते, अशी प्रतिक्रिया पीडित शिशूच्या पालकाने दिली.
या अग्निकांडातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते कमल नाथ यांनी केली आहे. या शोकांतिकेनंतर राज्यातील सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …