भाजीपाला विकणाऱ्या तरुणाची हत्या

आरोपींच्या अटकेसाठी नाशिककर रस्त्यावर
नाशिक – उद्योगनगरी, पर्यटननगरी म्हणून देशभर नाव कमावणाऱ्या नाशिकमध्ये सध्या खुनी खेळ सुरू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस पुत्राच्या निर्घृण खुनानंतर आता आणखी एका तरुणाची अतिशय निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. म्हसरूळ आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना घडली. राजू शिंदे असे मृताचे नाव आहे. तो भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत असे. या खून सत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि पोलिसांच्या हतबलतेविरोधात तीव्र संताप आहे. याचाच प्रत्यय बुधवारी आला. भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर शहरातील वातावरण तापले. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करीत मोठ्या संख्येने नाशिककर नागरिक रस्त्यावर उतरले होते.
एरवी रम्य, शांत असणारे नाशिक या आठवड्यात घडलेल्या घटनांनी हादरून गेले आहे. मंगळवारीच एका चार वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने हल्ला केला. या चिमुकलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी पोलीस पुत्राची झालेली हत्या आणि आता एका भाजीपाल्याचे दुकान चालवणाऱ्या तरुणाचा झालेला निर्घृण खून यामुळे सामान्य नाशिककर हादरून गेले आहेत. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत तरुण राजू शिंदे फुले नगरातल्या भराड वाडी येथे राहायचा. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते.
राजू शिंदे याचे भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. वर्चस्ववादाच्या प्रकारातून हा खून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात पोलीस पुत्राचा झालेला खूनही वर्चस्ववादातूनच झाल्याचे समोर आले आहे. राजू शिंदे यांच्या हत्येनंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले. आरोपींना तात्काळ बेड्या ठोका, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये तीव्र संताप होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …