पवार-ममता यांचे सूतोवाच
मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यातील आपल्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि भाजप विरोधातील आगामी रणनीती याबाबत चर्चा झाल्याची माहिती खुद्द शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. प्रादेशिक पक्षांना एकत्र करीत देशात भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या दोन्ही नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सूचक असे उत्तर दिले.
देशात काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण केला जाणार का?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी अत्यंत सावधगिरीने उत्तर दिले. कुणाला वगळण्याचा नाही, तर सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. त्यामुळे जो मेहनत करतोय आणि सगळ्यांसोबत येण्यासाठी तयार आहे, त्या सगळ्यांसह पुढे जाणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला बाजूला करून कोणताही पर्याय देणार नाही. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार सर्वात सिनिअर नेते आहेत, आता शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे काय?, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. त्यावेळी अरे काय यूपीए, आता कोणतीही यूपीए नाही. आम्ही सर्व बसून ठरवू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना मध्ये तोडत, शरद पवार म्हणाले की, इथे नेतृत्वाचा विषय नाही. एक सशक्त पर्याय, ज्यांच्यावर या देशातील जनतेचा विश्वास असेल. भाजपला दूर करण्यासाठी मदतगार होईल, त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने ऋणानुबंध आहेत. मंगळवारी ममतांनी राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली. आता त्यांनी माझी भेट घेतली. राष्ट्रीय पातळीवर जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावे आणि देशात पर्याय देण्यावर या बैठकीत चर्चा केल्याचे पवार यांनी सांगितले. जे लोक भाजपविरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही पवारांनी यावेळी केले. आहे.
विजय फिल्डवरचा
विदेशात राहून राजकारण करता येत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला होता. शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. साधी गोष्ट आहे, ग्राऊंडवर जाऊन ममता बॅनर्जी यांनी काम केल्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे समर्थन केले आहे. फिल्डवर राहून काम केल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाला. पश्चिम बंगालमधील लाखो कार्यकर्ते फिल्डवर होते, म्हणून त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिगत अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही त्याचे स्वागत करतो, असे पवार म्हणाले.
नेतृत्वाबाबत संभ्रम नाही
विरोधकांमध्ये नेतृत्वावरून संभ्रम आहे का?, असा सवाल करण्यात आला असता आमच्यासमोर नेतृत्वाचा प्रश्न नाही. भाजपविरोधात सक्षम पर्याय देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुणाच्या नेतृत्वात उभे राहायचे आणि कुणी नेतृत्व करायचे ही दुय्यम बाब आहे. आम्ही सक्षम पर्याय देणार आहोत. लोकांचा विश्वास निर्माण होईल आणि भाजपला दूर ठेवण्यास उपयोगी ठरेल, अशा मार्गाने आम्ही जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने कृ षी कायदे मागे घेतले आहेत. कायदे मागे घेण्याच्या पद्धतीवरही त्यांनी टीका केली. संसदेत चर्चा करण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळाली नाही. एखादा प्रस्ताव मागे घेताना चर्चा करायला हवी होती, हे आमचे म्हणणे आहे, असे पवार म्हणाले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …