भरदिवसा घरातून तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण

मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबई – मुंबईत भरदिवसा घरातून एका बाळाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी महिलेचा शोध सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही जुने कपडे आणि मोबाइल घेऊन त्याच्या बदल्यात भांडी, बास्केट देण्यासाठी आली. काळाचौकी परिसरात ही महिला आली होती. यावेळी घरात एकट्या असलेल्या बाळाच्या आईला एक बास्केट खरेदी करायचे असल्याने तिने या महिलेला बोलावले. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्याकडून जुना मोबाइल मागितला. तो मोबाइल आणण्यासाठी ज्यावेळी बाळाची आई घरातील दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी आरोपी महिलेने डाव साधला. बाळाची आई दुसऱ्या खोलीत गेल्याचे पाहून भांडी विक्रीसाठी आलेल्या महिलेने बाळाला एकटे पाहून त्याला उचलले आणि घरातून पळ काढला. ज्यावेळी बाळाची आई खोलीतून बाहेर आली तेव्हा बाळ नसल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. तसेच भांडी विक्रीसाठी आलेली महिलाही तेथे नव्हती. यावेळी आपल्या बाळाचे अपहरण झाले असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले. सदर भांडी विक्री करणारी महिला ही बाळाला घेऊन जात असताना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती महिला बाळाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …